Prit-Tuzi Mazi : प्रीत तुझी माझी २
माधव आता नेहमीपेक्षा जास्त जोमात आणि उस्फुर्ततेणें ऑफिस मध्ये काम करत होता, त्याच्या जीवनात माधवी नामक आनंद दरवळत होता. जी त्याच्या जीवनात स्फूर्ती बनून आली होती. ऑफिस मधील सर्व कामात तो झोकून देत होता. माधवीमुळे नवीन चैतन्य निर्माण झाले होते.
प्रत्येकाच्या जीवनात ठराविक टप्प्यात या घटना घडत असतात, त्यात मागे पुढे होत असते. काहींच्या जीवनात हे टप्पे येत असतात, पण त्या टप्प्याचे भोग मात्र काहींच्या जीवनात येत नाहीत, हे पण एक कोडेच वाटते. असे का व्हावे हे न उलगडणार रहस्य आहे. नियतीचे पट सामान्य जीवाला अनाकलनीय आहे, आणि या पटावर नियती खेळवत राहते. या नियतीचे गूढ गतजन्मताराशी बांधलेले असावे असे वाटते. जीवनाच्या संसारात सर्व काही सुरळीत चाललेले असताना, समुद्राची लाट यावी आणि त्या लाटेत वाळूचे शिल्प विरघळून जावे असेही पहावयास मिळते. जीवन फार विलक्षण चमत्कारिक आहे.
माधवी पण आता भातुकलीच्या खेळात रमून जावे, तशी माधवच्या कल्पित संसाराविषयी विचार करत त्यात रमून जात होती. फायनल कॉलेज वर्ष संपायच्या बेतात होते. पुढे शिकत रहायचं की संसारात रमायचं याचे विचारचक्र तिच्या मनांत चाललं होतं. माधवी मध्ये किंवा अन्य कोणाही नवं यौवनात जे विचार सतत येत असतात ते माधवीमध्ये पण प्रसव होत होते. तिच्या कॉलेजच्या दिवसांत तिचेही मन कित्येक तरुणांकडे आकर्षित होत होते, प्रत्येक तरुणीच्या मनात यौवनात हळुवार प्रेमाची कळी उमलत असते, आणि भ्रमराच्या भ्रमण लीला आकर्षित आगंतुक होत असतात. हे निसर्गाचे पैलू सर्वांमध्ये टप्पा टप्प्याने येत असतात. पण याला संयम आणि नीतिमत्तेची जोड असावी लागते, नाहीतर शांत ज्योतीच्या आकर्षण मध्ये कित्येक कीटक नष्ट होत असतात. माधवी पण इतर तरुण मुलांमध्ये मिसळून होती, पण माधवच्या आठवणी तिला सतत जाणवत असत. त्यामुळे एकप्रकारचे नकळत बंधन तिला येत होते. तिला माधवचा सहवास हवा होता, ही यौवनाची नकळत ओढ माधवीला खुणावत होती.
आज माधवीला कॉल करण्याची उत्सुकता लागली होती. तिने मोबाईल घेऊन माधवला रिंग लावली. माधव ऑफिसच्या कामात होता, त्यामुळे त्याला बॉसच्या समोर कॉल घेता येत नव्हता. एक दोन वेळा बॉसने माधवकडे तिरका कटाक्ष टाकला, त्यावेळी माधव दचकला होता. इकडे माधवी कॉल करून वैतागली होती. तिच्या मनाचा हिरमोड होत होता. माधव लग्नाआधीच असे कॉल टाळू लागला तर पुढे कसे? असा काहीसा खोचक विचार तिच्या मनांत आला. आणि पुढच्याच क्षणी मोबाईल स्विच ऑफ असल्याचा संदेश माधवीला मिळाला. त्यामुळे माधवी अधिकच हिरमुसली झाली. आता तर फोन लागतच नव्हता.
तेवढ्यात तिचा नेहमीचा जवळचा कॉलेज मित्र तिच्या जवळ आला, त्याने विचारले," माधवी, इकडे एकटीच कुठे बसली आहेस?
माधवी: काही नाही रे, फोन लावत होते, पण उचलत नाही.
मित्र: कोणाचा मैत्रिणीचा? या प्रश्नावर माधवी अडखळी, काय उत्तर द्यावे या विचारात पडली. होणाऱ्या नवऱ्याचा म्हणाव तर मित्र नाराज होतील ही त्या पाठीमागची भीती होती.
माधवी: नाही रे घरचाच होता, माधवीने अनुत्सुकतेने उत्तर दिले.
मित्र: माधवी चल, kantin मधे जाऊ, चहा घेणार का?
माधवी पण वैतागून गेल्यामुळे थोडा रिलॅक्स शोधत होती, तिला पण थोडा मोकळा वेळ होता, तिने होकार दिला. पण तिच्या मनाला हुरहूर लागली होती, माधवने फोन स्विच ऑफ का केला, काही महत्वाचं काम आहे, का मला टाळतोय असा पण प्रश्न तिच्या मनाला पडला. स्त्रियांच्या भावना फार विस्फारलेल्या असतात, असंख्य प्रश्न आणि नाना प्रकारचे तर्क त्यांच्या मनांत सुरू असतात ही नैसर्गिक देणगी मूळचीच असते फक्त त्याला 'कारण' नावाची धग पुरेशी असते. तिने तात्पुरता माधवचा विचार सोडून दिला आणि ती मित्रा बरोबर कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये शिरली. एका प्लास्टिकच्या टेबलावर दोघे स्थिरावले, दोघेही बसले.
मित्र: माधवी, चहा की कॉफी सांगू, आणि काही खाणार आहेस का?
माधवी: नको, फक्त चहाच सांग. आणि माधवीने परत बॅग मधून मोबाईल बाहेर काढला, आणि माधवचा नंबर लावला. अजूनही मोबाईल स्विच ऑफ होता. तिने वैतागून फोटो गॅलरी ओपन केली आणि माधवने पाठवलेला फोटो पाहू लागली. दिसायला माधव सुंदरच होता, थोडासा कृष शरीराचा वाटत होता. पण दिसण्यात एक आकर्षक होता. आणि समोरचा मित्र माधव पेक्षा अधिक रुबाबदार आणि भारदस्त होता. माधवचा संपर्क होण्याआधी बऱ्या वेळा माधवी त्या मित्राकडे आकर्षित व्हायची, फार काय तिने लग्नाची दिवास्वप्ने पण पाहिली होती. ही काहीशी द्विधा अवस्था असतानाच मित्राचा आवाज आला.
"माधवी, चहा" माधवीने दचकून मित्रा कडे पहिले, तिला संशय आला मित्राने फोटो तर पाहिला नसेल. पण त्याने नव्हता पहिला. तिने पटकन् मोबाईल बंद केला. तिच्या त्या हालचालीने मित्र आश्चर्यभाव होऊन तीला म्हणाला,
"माधवी कुठे हरवलीस?"
माधवी: कुठे हरवते? मोबाईल बंद करत होते.
मित्र: म एवढं दचकायला काय झालं?
माधवी: "बर बाबा घे तो चहा." माधवीने थोडा वेळ माधवचा विषय मनातून बाजूला केला, आणि ती मित्रांमध्ये दंग झाली. बायकांचा किंवा स्त्रियांचा एक स्वभाव असतो, जो कार्यभाग आपल्याला करायचा असतो त्याची चाचपणी त्या इतरांना विचारतात किंवा त्याबद्दलची उत्सुकता दुसऱ्याकडून जाणून घेतात, जसे मी त्या गावची नाहीच असा भाव प्रकट करतात. माधवीने पण त्याच पद्धतीने मित्राला लग्ना बद्दल विचारले, "काय मुलगी पहिली की नाही एखादी" मित्र पण हजरजबाबी होता, "ही काय समोरच आहे".
माधवी: तसे नाही रे, म्हणजे लग्नाची
मित्र: "छे, एवढ्या लवकर कुठे, अजून बहिणीचे लग्न व्हायचंय. माधवी, मला अजून तशी मनासारखी मुलगी भेटलेली नाही."
या उत्तराने माधवी हिरमुसली, तिला वाटले तो तिच्याबद्दल काही बोलेल, एक जिव्हाळ्याचा कोपरा माधवी त्याच्यात शोधत होती. पण त्याच्या मनांत काय आहे याचा माधवीच्या मनाला उलगडा लागत नव्हता. त्यामुळे ती भावनिक जागा पुन्हा माधवच्या रूपाने माधवीच्या मनांत शिरली. ती जी इच्छा मनांत धरून होती, ती तिला मित्राच्या बोलण्यात दिसली नाही.
"माधवी तू काय ठरवले आहे, एखादा मुलगा बघितला की नाही घरच्यांनी".
माधवी: नाही अजून, काही स्थळ आली आहेत, पण मी अजून विचार नाही केला लग्नाचा.
माधवीने माधव बद्दल काही न सांगण्याचा मनात निर्धार केला होता. पण ती त्याच्याकडून अजून अपेक्षा करीत होती. बोलता बोलता, कॉलेज मधील एक मस्तवाल ग्रुप कॅन्टीन मध्ये आला. त्यातील काहींनी माधवीला हाय हॅलो केले. माधवी पण त्यांना ओळखत होती. ते टोळकं बाजूच्याच टेबलावर स्थिरावल, त्यांच्या आवाजाने कॅन्टीन मधली शांतता भंग झाली. हास्य कल्लोळांचा आवाज कॅन्टीन भरून बाहेर पसरत होता. त्यातील एकाने माधविकडे पाहत, विचारले
"माधवी आज घरी नाही जायचं वाटत, अगं तुझा क्लास केव्हाच संपलाय, ज्यादा तास आहे का?
माधवी: ज्यादा कुठे, अरे घरीच निघाले होते. अरे रवी तू मला लिफ्ट देना, आज बस मिळेल की नाही शंका वाटते.
रवी: पण आता लगेच नाही निघणार मी माधवी, थोडा वेळ लागेल. थांबत असशील तर सोडतो, नाहीतर एक काम कर , स्वप्नील निघालाच आहे, तो सोडेल तुला घरी.
हे सर्व बोलणे चालू असताना, त्यातील मुख्य असलेला बाबू माधवी कडे पाहत बोलला, "माधवी, मी मी निघालो आहे, चल मी सोडतो तुला घरी". या बोलण्याने मित्र चक्रावले, कारण त्यांचे थांबण्याचे प्लान वेगळाच होता, आणि बाबू असे बोलण्याने ते चक्रावले.
अरे बाबू पण आपल्याला जायचं आहे ना, मग कस काय?
या बोलण्याने माधवीने बाबूच्या मनाचा अंदाज घेतला, हा मुद्दाम लिफ्ट देतो आहे. माधवी शक्यतो बाबूला आत्तापर्यंत टाळत आली होती. कारण ते थोडा मस्तवाल स्वभावाचा होता. कॉलेज मध्ये त्याची बरीच प्रकरणे गाजत होती. तो त्या सर्वांचा सूत्रधार होता. त्यामुळे माधवी त्याला टाळत होती. पण बाबू माधवी गळाला लागत नव्हती. त्यामुळे बाबू जिथे मोका मिळेल तिथे माधवीशी जवळीक करण्याचा प्रयत्न करायचा. आत्ताही बाबू पुढे होऊन माधवीला लिफ्ट देण्याबद्दल प्रयत्न करत होता. माधवीने एक हास्य करत बाबुला नकळत नकार दिला.
माधवी: नकोरे बाबा तू नेहमी बिझी असतोस, तुला कुठे सवड आहे. माधवीने त्याला टाळण्याचा भाव ठेवला.
बाबू: काय माधवी, आमची लिफ्ट नकोय का तुला? बाबू काकुळतीने म्हणाला. तो ओळखत होता, माधवी त्याला टाळते आहे. त्यामुळे तो आणखीन जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता.
बाजूलाच असलेला माधवीचा मित्र मधू बोलला, "जाऊ दे चल माधवी, मघापासून आपण इथेच बसलोय, चल निघूया". हे बाबूंच्या लक्षात आल्यावर, बाबू मधुवर खवळला.
बाबू: "ये मधू कुठं निघालास, आम्ही आल्या बरोबर तुम्ही जायला निघाला. अरे आता कुठे आपली पार्टी सुरु झालीय. आणि तुम्ही, काय रे बरोबर की नाही?"
मधू: "तसे नाही रे, तुम्ही येण्याआधी आम्ही चहा घेतलाय, आणि बराच वेळ झालाय आम्ही इथे थांबलोय."
बाबू: "अस, म्हणजे दोघात पार्टी, आम्ही काय गुन्हा केलाय की आमच्या बरोबर तुम्ही सामील होत नाही. काय माधवी, मधुवर जास्त भरोसा आणि आमच्यावर नाही".
मधू: बाबू, कुठे विषय नेतोस? मधू आतमधून संतप्त होत चालला होता. "आम्ही फक्त चहा घेतलाय आणि निघालोय"
बाबू: "आम्हाला बगल देत, चालला."
माधवी: "अरे बाबू तू गैरसमज करून घेतोस. आपण सगळे मित्रच आहोत."
बाबू: "मग हो आमच्यात सामील, तर मी मानेन. अरे चहा मागवा रे, स्पेशल माधवी बस बघू."
माधवी: "अरे चहा घेतलाय आम्ही. परत चहा नाही घेता येत मला, मळमळ होईल."
बाबू: "हे, बघ चहा आला सुद्धा, घ्या रे, माधवी घे."
आता माधवी नाईलाजाने मधू कडे पाहू लागली, मधू पण नकारात्मक भाव दर्शवित होता.
मधू:" बाबू, परत केव्हा तरी घेऊ, आता नकोय चहा."
बाबू: "आणि ह्या राहिलेल्या चहाच काय करायचं, फेकायला आणलं का?"
मधू: "ठीक आहे, त्याचे पैसे मी देतो. पण डबल चहा मला पण नाही घेता येत".
बाबू: "अरे बघा रे, आमची प्रेमाने दिलेल्या चहाची किंमत, ये मध्या, पैसा डावतोस मला". असे म्हणून बाबू ताडकन उभा राहिला, आणि मधुच्या कडे रागाने पाहू लागला. माधवीने प्रसंग ओळखून नमते घ्यायचे ठरवलं. कारण बाब्या प्रकरण हातघाईवर नेऊ शकतो हे तिला ठाऊक होतं. माधवी बाबू आणि मधुच्या मध्ये येत म्हणाली.
माधवी: "बाबू, बाबू अरे चिडतोस कशाला, हा घे मी घेते चहा, पण असे भांडू नका". माधवीने चहाचा कप उचलला, मधू रोखून पाहत होता, तो बाबूला एकटा पुरा होता, पण बाबूच्या बाजूला वानर सेना होती, त्यामुळे त्याने आवरते घेण्याचे ठरवले, पण चहा त्याने घेतला नाही.
बाबू अजून पण घुश्यात होता, तो मधूला रोखून पाहत होता. त्याला वाटत होते की, मधू आणि माधवीचे प्रेम प्रकरण आहे, आणि त्यामुळे माधवी आपल्या कडे आकर्षित होत नाही. पण माधवी बाबूच कॅरेक्टर ओळखून होती.
तिथून माधवी आणि मधू बाहेर पडले, त्या टोळक्याचा हास्यकल्लोळ चालूच होता. माधव आणि मधू कॉलेजच्या गेटमधून बाहेर आले, आणि बस स्टॉप कडे चालू लागले.
बाहेर येताच मधू बोलला
मधू: "माधवी , बाबू पासून थोड दूरच रहा, मागे एकदा बोलताना मी ऐकले आहे, तो तुला पटवायचा प्रयत्न करतोय, तसा प्लान करण्याचे ठरवतो आहे. तसा मोठ्या बापाचा आहे तो, काहीही करू शकतो. तू फक्त सावध रहा"
नकळत बाबू माधवीच्या मनात शिरत होता, त्याचे एकंदर वागणे पाहून माधवीला समजून आले होते. तसा तो श्रीमंत घरातील होता, दिसायलाही सुंदर होता पण पैशाच्या जोराने त्याला बेफिकीर बनवले होते.
क्रमशः
0 टिप्पण्या